श्री सद्गुरु सिद्धराज माणिकप्रभु महाराजांना ज्यांनी जवळून पाहिले आहे त्यांना माहित आहे कि महाराज बहुधा उघडपणे काही न बोलता संकेतानी आपला संदेश भक्तांना कळवायचे. सद्गुरूंनी उद्गारलेला प्रत्येक शब्द तर मोलाचा असतोच पण कधी-कधी न बोलता ते जे सांगतात त्यांनी आपला उद्धार होऊन जातो. आवश्यकता असते ते त्यांच्या प्रत्येक संकेताकडे लक्ष देण्याची. कित्येकदा शिष्याच्या हिताचा काही संदेश त्या संकेतांत दडलेला असतो. पुष्कळ शिष्यांना असे अनुभव आले असावेत. मला देखील अनेक वेळी असे अनुभव आले आहेत. महाराज प्रत्यक्षात बोललेले आठवत नाही पण निरोप स्पष्टपणे मिळाला. अशीच एक घटना लक्षात राहिली, ती आज आठवते.

शिक्षण संपल्यावर आमच्या वडिलोपार्जित दुकानाची जवाबदारी माझ्यावर पडली. तरीही मी होता होईल तो दत्तजयंती उत्सव चुकवीत नसे. माणिकनगरला निघताना मी मनातल्या मनात प्रभूंना प्रार्थना करीत असे की माझ्या गैरहाजरीत माझं दुकान त्यांनीच सांभाळावे.

असंच एकदा मी माणिकनगरला असताना दुकानात कांहीतरी अडचण आली व मी महाराजांना म्हणालो, ‘‘आता आपणच सांभाळा.’’ महाराजांनी माझ्याकडे फक्त बघितले आणि माझ्या कानात शब्द दुमदुमले, ‘‘एरवी तुझे दुकान कोण सांभाळतो?’’ मी दंग राहिलो. माझा विश्वासच बसेना, हे कसे शक्य आहे? काहीही न बोलता महाराजांनी मला उत्तर दिले. चमत्काराच्या गोष्टी ऐकण्यात आणि प्रत्यक्ष चमत्कार अनुभवण्यात खूप फरक असतो, हे मला तेव्हां कळाले. माझी गोंधळून गेलेली अवस्था महाराज पाहत होते पण महाराजांच्या डोळ्यात पाहाण्याची हिम्मत त्या वेळी मला झाली नाही. पटकन मी वाकलो आणि श्रीजींच्या पायांवर डोके टेकविले.

‘‘एरवी कोण सांभाळतो?’’ खरेंच आहे. आपल्याला आपल्या कर्तृत्वाचा अभिमान असतो आणि वाटत असते की मी सर्व करतोय. पण खरं पाहू गेल्यांस ‘‘कर्ता हर्ता तो करवीता। मी मिथ्या जन बोली। प्रभुविण कोण कुणाचा वाली।।’’.

त्या क्षणीं मला ह्या गोष्टीची जाणिव झाली की आपल्या आयुष्यात आपल्या कळत न कळत कित्येक वेळेला कित्येक प्रसंगात आपले सद्गुरूच आपला सांभाळ करीत असतात आणि आपल्याला ह्याची जाणीव देखील नसते. आपण फक्त मी-मी चा डंका वाजवीत असतो. म्हणून प्रत्येकानी सदैव आपल्या योगक्षेमाची काळजी वाहणार्‍या आपल्या सद्गुरूंचे सदैव आभार मानावेत.

[social_warfare]