न मिळे अशी मौज पुन्हा

यंदाची दत्तजयंती अनेक दृष्टीने वैभवसंपन्न ठरली. रंगीत इंद्रधनुष्य ठायी ठायी वैभव संपन्न होत होती. आनंद आणि ज्ञानाचा राजमार्ग क्षणोक्षणी श्री ज्ञानराज प्रभु शब्दांकित करत होते. देवळातून कृपा प्राप्त होते पण ज्ञान सजीव गुरूच देऊ शकतो असे ठाम प्रतिपादन करीत प्रत्येकाची बॅटरी चार्ज करण्याकरिता गुरुच आवश्यक असतो असा बोधक संदेश देत आध्यात्मिक मार्गदर्शन करत होते. आणि श्रवण, मनन निदिध्यस हा त्रिसूत्री फार्मूलाच मोक्षप्राप्ती करून देतो असे ठामपणे सांगीतले.

या दत्तजयंती चे आणखी एक लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे चैतन्यराज प्रभुंचे माणिक प्रभु चरित्रावर विश्लेषक प्रवचन आणि त्यास पद्यमालातील पदांचे समर्पक विश्लेषण ची जोड देत श्रोत्यांना परम आनंदाची अनुभूती देत होती. चैतन्यराज यांचे संगीतमय प्रबोधन ऐकताना एक आठवण आली ती मुद्दाम येथे सांगू इच्छितो. मार्तंड प्रभु जेव्हा एखादे पद लिहून झाले की ते पद कोणाला तरी प्रथम ऐकवावे या हेतूने कोणाला तरी ऐकण्यासाठी बोलवावे तर तसा सेवक मिळत नसे असे वारंवार घडत असे त्या वेळी मार्तंड प्रभु म्हणत की काय हे लोक एकालाही यातला गोडवा कळत नाही सगळेच अगदी सारखेच आहेत असे म्हणत. पण आज चैतन्यराज, मार्तंड प्रभुंचे पदांचा संदर्भ देत प्रभु चरित्र सांगत आहेत हे पाहून मार्तंड प्रभुंच्या मनात आणि माणिक प्रभुंच्या मनात चैतन्यराजां विषयी काय भावना झाल्या असतील असं नुसतं मनात आलं तरी आपलं मन एक वेगळीच ऊर्जा निर्माण करते. चैतन्यराज प्रभुंचा प्रवचन ऐकून हेच मला जाणवलं. या सगळ्या बाबी विचारात घेऊन पदांचा संदर्भ समजून घेत प्रभु चरित्र श्रवण मनन आणि निदिध्यस द्वारे समजून घेतलं तर प्रत्येक पद आपणाशी बोलके होईल हाच संदेश चैतन्यराजांच्या प्रवचनाच्या माध्यमातून मिळाला.

देवलोकातील स्वर्गीय आनंदाची अनुभूती देणारी दत्त जयंती – असेच वर्णन यावेळी करावे लागेल.
बस इतकेच लिहून विराम घेतो की – न मिळे अशी मौज पुन्हा पाहण्या नरा!!

योगक्षेमं वहाम्यहम्

ही गोष्ट आहे हरवलेल्या एका झांजेची… माणिकनगर ते नांदेड आणि पुन्हा माणिकनगर असा प्रवास करुन शेवटी माणिकनगर मध्येच सापडलेल्या एका झांजेची…

तर झाले असे की 2021 सालच्या दत्तजयंती उत्सवात प्रभु कृपेने आम्हा ठाणेकर भक्तांना एका नृत्यनाटिकेद्वारे प्रभुंची नाट्य सेवा करण्याचे सौभाग्य लाभले. नाटिकेकरिता इतर वाद्यांसोबत एक पखवाज आम्हास हवे होते. नांदेडचे काही प्रभु भक्त आले होते, त्यांच्या जवळ पखवाज होते, आणि त्यांनी आनंदाने आम्हास पखवाज दिले. स्टेज वर आमचे पखवाज वादक आणि झांज वादक बाजुबाजुला बसले होते. नाटिका झाल्यावर सर्व कलाकारांना आशीर्वाद घेण्यास महाराजांच्या निवास स्थानी बोलविण्यात आले. त्या लगबगीत सर्व वाद्ये स्टेज वर तशीच ठेवून आम्ही तेथून निघालो. आमच्या मागे इतर ठाणेकर प्रभु भक्तांनी स्टेज वरील सामानांची आवराआवर केली. श्री विजय कुलकर्णी ह्यांनी पखवाज नांदेडकरांनी दिलेल्या पिशवीत भरले. झांज कोणाची ते ठाऊक नसल्यामुळे, आणि ती पखवाजा बाजुलाच असल्यामुळे त्यांनी त्याच पिशवीत झांज सुद्धा भरली. नांदेडकर भक्त आपली पिशवी घेऊन गेले. खूप वेळा नंतर सामान गोळा करताना आमच्या लक्षात आले की झांज सापडत नाही आहे! झांज नांडेडकरांच्या पिशवीत आहे, हे कळल्यावर त्यांच्या कडे चौकशी केली, मात्र त्यांना पखवाजाच्या पिशवीत झांज काही सापडेना!! ती झांज होती ठाणेकर प्रभुभक्त श्री सुभाष चित्रे (माझे वडिल) ह्यांची. झांज हरवली हे ऐकून बाबा अगदीच हताश झाले!!

एक छोटीशी झांजच ती! तिचे एवढे काय कौतुक??कौतुक एवढ्यासाठी की शंभर वर्षाहून अधिक काळ ही झांज आमच्या कुटुंबात असावी. कारण ही झांज आमच्या पणजोबांच्या बालपणापासून तरी नक्कीच आमच्याकडे आहे असे माझे आजोबा सांगायचे आणि पणजोबांचा जन्म १९०० सालचा होता. दुसरे असे की असा नाद व आवाजाचा गोडवा असलेली झांज आजपर्यंत शोधुनही कुठे मिळाली नाही. गणेशोत्सवात व नवरात्रोत्सवात बऱ्याच ठिकाणी आम्ही ही उपयोगात आणतो. ज्या आप्तांकडे आरती अथवा भजनाला आम्ही जातो त्यांचा आग्रहच असतो की येताना ही झांज आठवणीने घेऊन यावी.

तर अशी ही चित्रे कुटुंबाची ठेवणीतील झांज माणिकनगर मध्ये हरवली! माझे बाबा, माझे काका – ह्यांना तर अनेक दिवस स्वस्थ झोप लागेना. जवळचे आप्त, मित्र ही हळहळले!

पुढे वेदांत सप्ताहासाठी आम्ही पुन्हा माणिकनगरला आलो. एके दिवशी एक सद्गृहस्थ माझ्या पाशी आले व जयंती उत्सवात नृत्यनाटिका आम्हीच केली होती का म्हणून चौकशी केली. मी हो म्हटल्यावर ते म्हणाले “तुमची एक झांज हरवली होती ना त्या वेळी? ती आमच्या पाशी आहे”. ” काय? आपल्या कडे? कसे काय? आपण कोण? कुठून आलात?” – मी विचारले. ते म्हणाले – “माझे नाव उत्तरवार. मी नांदेडहून आलोय. नांदेडला परतल्यावर ती झांज आमच्या एका पिशवीत सापडली. पखवाजाच्या पिशवीत नाही, दुसऱ्याच एका पिशवीत”.

आम्हाला कोण आनंद झाला!!! प्रभु कृपेनेच झांज मिळाली असे उद्गार सर्वांनी काढले. माझे वडिलच नाही, तर तेव्हा हळहळलेल्या सर्वांच्या डोळ्यात आता आनंदाश्रु आले! माझ्या आईला ही गोष्ट समजली, तेव्हा ती हसली, म्हणाली “मला आनंद तर झाला आहे, पण आश्चर्य नाही वाटत, कारण मला खात्री होती की वेदांत सप्ताहात आपल्याला झांज सापडणार!!” खात्री होती?? कशी काय? तर म्हणाली “मी प्रभुंकडे नवस बोलले होते, सप्ताहात झांज परत मिळावी म्हणून, आणि मला 100 टक्के खात्री होती की तसेच होणार”!! नंतर माझ्या काकांकडून कळले, की ते सुद्धा नवस बोलले होते!

श्री प्रभु!! त्यांच्या नावातच प्रभुत्व!! पण भक्तांच्या छोट्या छोट्या मनोकामना पूर्ण करण्यास सदैव तत्पर असतात आपले प्रभु! आणि अपेक्षा कसली, तर फक्त भाबड्या भक्तिची आणि अढळ श्रद्धेची!!

नवस तरी वेगळा काय असतो? हो, काही लोक म्हणतात की नवस म्हणजे देवाबरोबर केलेला सौदा आहे. खरे आहे काही अंशी – सौदाच की तो.. पण कसला? तर आपल्या भावना आणि त्याची कृपा ह्यांचा!! वस्तु तर निमित्तमात्र आहेत, एक माध्यम आहेत – आपल्या भावना आणि त्याची कृपा एकमेकांना व्यक्त करून दाखविण्याकरिता.

अशा छोट्या-छोट्या अनुभवांतून हे सतत जाणवत रहाते की भगवद्गीतेत भगवंतांनी दिलेले ‘योगक्षेमं वहाम्यहम’ हे वचन आपले प्रभु आज ही पूर्ण करीत आहेत, आणि म्हणुनच एका प्रसिद्ध गाण्याचा आधार घेत असे म्हणावेसे वाटते –

लाभले आम्हास भाग्य भजतो प्रभु माणिकेश

लाभले आम्हास भाग्य भजतो प्रभु माणिकेश
जाहलो खरेच धन्य पुजतो प्रभु माणिकेश

कृष्ण, विष्णू, जगदंब, सांब, राम – माणिकेश
काशी, पुरी, गिरीनार, चारधाम – माणिकेश

नित्य आमुचे प्रात:स्मरण – प्रभु माणिकेश
जप, तप, ध्यान आणि धारण – प्रभु माणिकेश

बेसुरेसे सूर अमुचे भजन करत – माणिकेश
वाणी आणि लेखणी करी स्तवन सतत – माणिकेश

परिक्षे, प्रवासा आधी स्मरतो प्रभु माणिकेश
असो काहीही प्रसंग प्रार्थितो प्रभु माणिकेश

वारसा पुढील पिढीस – भक्तिभाव माणिकेश
स्थान श्रद्धेचे अमुचे, एक ठाव – माणिकेश

 

ज्ञानसागर

समुद्राचे कुतूहल असणाऱ्या बालकाला येणाऱ्या प्रत्येक लाटेचे अप्रूप वाटते. प्रत्येक लाटेत पाणी तेच पण नजाकत वेगळी. सामान्य समुद्राची जर अशी आगळीक तर ज्ञानसागरास भरती येते तेव्हा पाठोपाठ चार लाटांचे रसपान होते.परम आदरणीय, प्रातःस्मरणीय प.पू. श्री ज्ञानराज माणिक प्रभू रुपी ज्ञानसागराने आमची पात्रे भरली गेली. चिंतनास प्रवृत्त झाली.

सगळे प्रभूने हिरावले, देहवासना हिरावली, आता सुख दुःखाच्या लाटांची काय तमा? अशी प्रभूने कृपाच केली सांगणारे प्रभूने मेरा सबकुछ छिना हे पहिल्या लाटेचे गाणे .ज्ञान नही अब कुछ करनेको यातील श्लेष चिंतनीय ठरला.त्यात न्हाऊन निघालो तोच सत्य एकच असते हे सूत्र जहाँ मै अडा हू द्वारे चपखल पटवून दिले. करो दस्तखत मै कोरी वही हू यातील समर्थता अगस्तिनच्या आचमनाची आठवण देऊन गेली.याही लाटेचा आस्वाद घेतला. मननाची डुबकी मारली. तोवर अजून एक लाट आली. अति सुंदर अशी ती लाट!! ती लाट म्हणाली,नाम आणि रुपात अडकेल तो प्रभू नाहीच. प्रभू तर त्याच्याही अतीत आहे. पण ते ज्ञान होण्यासाठी नाम हे साधन आहे . नाम जिसका है न कुछ ने नवा आयाम दिला. उत्तरोत्तर उपनिषदांकडे कूच करताना ज्याची सर्वांना जिज्ञासा असते ते ब्रह्म कुठे पाहायला मिळेल का? याचे उत्तर वही है ब्रह्म उसे पहचान मध्ये विस्तृत सांगितले, एका अर्थी ब्रह्मदर्शन च घडवून दिले.

काय म्हणावे या रचनांना? माणिकनगरी असलेल्या ज्ञानसूर्याबद्दल काही लिहिणे किंवा बोलणे म्हणजे शब्दांचा केवळ धडपडाट!! ती कृत्रिमता टाळून दोन हात आणि एक शीर लवून नतमस्तक होणे यातच खरी धन्यता वाटते.
प.पू. महाराजांच्या वाणीतून येणारे प्रत्येक अक्षर आम्हास मौल्यवान आहे हे मात्र खरे. त्याचा लाभ सर्वांना सदा सर्वदा होवो ही माणिक प्रभूंच्या चरणी नम्र विनंती.

वेदांत सप्ताह भाग बारावा

भोजनशाळेतून दिंडी आता नगरप्रदक्षिणेसाठी निघाली. भोजनशाळेच्या पश्चिम दरवाजातून दिंडी माणिकनगर गावातून फिरून श्रीव्यंकम्मामाता मंदिरापर्यंत जाते आणि तेथे अल्पविराम घेऊन पुन्हा मुक्ती मंडपात येते. भोजन शाळेतून बाहेर पडल्यावर लगेचच मंदिरांच्या पुजाऱ्यांची घरे लागतात. प्रत्येक घरासमोर छान रांगोळ्या काढल्या होत्या. घरांच्या मुख्य दरवाजासमोर एक एक पाट ठेवला होता. त्याच्याभोवती फुले, रांगोळ्यांची सुंदर सजावट होती. दिंडीच्या मार्गातल्या जवळजवळ प्रत्येक घरी हीच परंपरा जपली आहे. त्या त्या घरासमोर श्रीजी ह्या पाटावर उभे राहतात आणि घरातली सौभाग्यवती श्रीजींचं औक्षण करते. घरातली पुरुष मंडळी श्रीजींना पुष्पहार घालतात, श्रीजीवर कुरमुरे उधळतात. स्वागताची एक वेगळी अशी ही परंपरा माणिकनगरात अनुभवायला मिळते. घरातले इतर सदस्यही नंतर श्रीजींना वंदन करुन त्यांचा आशीर्वाद घेतात. श्रीजीसुद्धा आशीर्वादपर सर्वांवर बुक्का उधळतात. हा सर्व स्वागतसोहळा सुरू असताना पुढे वाद्यांच्या कल्लोळात प्रभुपदे म्हटली जातात. भोजनशाळेपासून  श्री शिवपंचायतन मंदिरापर्यंत “किति जनांसी भ्रम हा झाला, मी ब्रह्म न कळे जीवाला” हे सुश्राव्य पद कानी पडत होतं. श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या पदांची झेप अवकाशाला गवसणी घालणारी आहे. आपण ही पदे बऱ्याच वेळा ऐकतो. पण एका विशिष्ट स्थळी, एका विशिष्ट काळी त्याची परिणामकता अधिकच जाणवते. पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर “अहं ब्रह्मास्मि” ह्या महावाक्याची अनुभूती करून देणारे हे पद ऐकणं अत्यंत रोमांचकारी होतं.

दिंडी आता श्री शिवपंचायतन मंदिरासमोर आली होती. माणिकनगरची स्थापना झाली तेव्हा, श्री माणिकप्रभुचे थोरले बंधू श्री हनुमंतदादा यांनी श्री शिव पंचायतन मंदिर बांधून घेतले. या मंदिरात मधोमध शिवलिंग असून चार कोपऱ्यांत गणपती, देवी, विष्णू आणि सूर्यनारायणाच्या सुंदर कोरीव मूर्ती स्थापित आहेत. श्री शिव पंचायतन मंदिरासमोर “जयदेव जयदेव जय पार्वतिरमणा, हर पार्वती रमणा” ही शंकराची आरती झाली. उपस्थितांनी श्रीजींना औक्षण केलं. येथेही श्रीजींवर कुरमुरे उधळले गेले. आशीर्वाद पर बुक्का प्रत्येकावर पडत होता. अवचितपणे अधून मधून तो माझ्याही अंगावर पडत होता. बुक्क्याच्या त्या मंद दरवळीने मन प्रसन्नतेचा अनुभव करत होतं. श्री शिव पंचायतन मंदिराच्या आवारातून बाहेर पडताना श्रीजींच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज झळाळत होते. त्यानंतर “गजवदन चित्प्रभू लीला” हे श्री मार्तंड माणिकप्रभुंच स्तिमित करणारं पद म्हटलं गेलं.

श्री शिवपंचायतन मंदिरापासून दिंडी आता बाजाराकडे निघाली होती. ह्या मधल्या अंतरात “ऐका तुम्ही संत अनाथाच्या बोला, तुम्ही अवतरला जगकल्याणा” हे पद म्हटलं गेलं. वाटेत लागणाऱ्या घरांमधले सर्वजण श्रींजींच्या स्वागतासाठी उत्सुक होते. पहाटे साडेतीन पावणेचारच्या सुमारासही अवघ माणिकनगर जागं होतं आणि त्या सार्‍यांना आशीर्वाद देण्यासाठी हा, श्री माणिक प्रभु गादीचा पीठाधीश रात्रभर माणिकनगरच्या गल्लीबोळातून फिरत होता. खरोखर ती रात्र मंतरलेली होती. रात्रीच्या मिट्ट काळोखला घरोघरी उजळलेले दिवे तीरोहित करत होते. श्रद्धा आणि भक्ती आज पूर्ण कलेने माणिकनगरामध्ये प्रकाशमान होती. बाजारामध्ये पोहोचताच “संत शिरोमणी खरा परंतु तें नाही बा तें नाहीं” हे पद म्हटलं गेलं. त्यानंतर दिंडी पुढे श्री विठोबामंदिरासमोर आली. येथे “गोपी निन्न कंदा बाल मुकुंदा” हे कानडी पद म्हटले गेले. येथे माणिक नगरातली बरीच कुटुंबे श्रीजींच्या स्वागतासाठी एकत्र आली होती. कुरमुरे, बुक्क्याची उधळण चालू होती. प्रसाद रुपी मिळालेले श्रीफळ गावकरी जवळच असलेल्या ध्वजस्तंभाच्या जवळ जाऊन फोडून प्रसाद म्हणून खात होते. इतक्या पहाटे लहान मुलेही तितक्याच उत्साहाने श्रीजींचा आशीर्वाद घेत होती. दिंडीचे आपल्या घरी येणं हा प्रत्येक माणिकनगरवासीयांसाठी आनंदोत्सव होता आणि घरातील प्रत्येक जण ह्या आनंद सोहळ्यात उस्फूर्तपणे सहभागी झाला होता. श्रीजी आणि गावकरी यांच्यातील असलेले स्नेहबंध ह्यावेळी अनुभवता आले. श्रीजी प्रत्येकाची आस्थेवाईकपणे विचारपूस करत होते.

दिंडी आता श्री मारुती मंदिरासमोर आली होती. एव्हाना पहाटेचे पाच वाजत होते. सुरांचा आणि वाद्यांचा कल्लोळ त्याच जल्लोषात त्याच उत्साहात सुरू होता. चैतन्याची ही अभूतपूर्व अनुभूती होती. येथेही माणिकनगरवासियांचा श्रीजींच्या स्वागतासाठी ओघ सुरुच होता. श्री मारुती रायासमोर “जय देव जय देव जय जय हनुमंता” ही आरती म्हटली गेली. त्यानंतर “प्रसवली माता तुज वायुसुता”, “गुज बोलवेना बाई, सुख सांगवेना बाई, स्फूर्ती आवरेना”, “आता जाई रे शरण जरी धरिसी चरण” ही पदे म्हटली गेली. पिंपळाच्या झाडाखाली पहाटेच्या नीरव शांततेत या पदांची गोडी प्रचंड जाणवली. वाद्यांच्या या कल्लोळात पिंपळही आपल्या पानांची सळसळ करून जणू ह्या दिंडीमध्ये आपणही सहभागी असल्याची जाणीव करून देत होता. श्री माणिक प्रभुंच्या काळापासून‌ ह्या मारुती मंदिराचे महत्त्व आहे. श्री मारुती मंदिरापासून दिंडी आता श्री व्यंकम्मा मातेच्या मंदिरापाशी आली होती. हे अंतर जेमतेम दहावीस पावलांचे असेल. ह्या वाटेवर “स्फुरद्रुपी श्री जगदंबे, सच्चिदानंद प्रतिबिंबे” चा जयघोष झाला. दिंडी आता श्री व्यंकम्मा मातेच्या मंदिराच्या आवारात आली होती. आज श्री देवी व्यंकम्मा अष्टभुजा रूपात सजली होती. देवीच्या काठी हातात शस्त्रे होती. महाप्रसादाचे भोग देवीला अर्पण करण्यात आले होते. देवीसमोर अनेक ओट्या भरल्या होत्या. दिंडीतून आपली लेकरं आपल्याला भेटायला आलेली पाहून तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. श्री व्यंकम्मामातेचे मनोभावे दर्शन घेतले. अनेक स्त्रियांनी देवीची ओटी भरली. देवीच्या समोरील मंडपात, आजूबाजूच्या ओसरींमध्ये गायक आणि वादक, गावकरी आणि दिंडीतील सहभागी मंडळी अल्पविराम घेत होती. श्री व्यंकम्मा माता मंदिरात पंधरा-वीस मिनिटांसाठी अल्पविश्रांती घेतली जाते. दिंडी मधील सहभागी सर्व जणांना चहा चिवडा आणि उपमा दिला गेला. भजनांचा झरा मात्र देवी मंदिरात अखंड वाहत होता. मंदिराच्या ओसरीत थोडावेळ बसलो. पहाटेच्या गार वातावरणात गरमागरम चहा आणि उपमा मनाला तजेला देऊन गेला. पंधरा-वीस मिनिटांच्या अल्पविरामानंतर “येई येई ग चित्कमले, चिन्मधु उन्मनी बाले”, “व्यंका नाम जगज्जननी, कुलभूषण ही अवतरली हो” ही देवीची पदे म्हटली गेली.त्यानंतर “जयदेवी जयदेवी जय जय रेणुके”, “जयदेवी जयदेवी जय निर्विकल्पे” आणि “व्यंके तुज मंगल हो, माणिकश्री मंगल हो” ह्या देवीच्या आरत्या म्हटल्या गेल्या. श्री व्यंकम्मा मातेच्या मंदिरातून दिंडी आता प्रदक्षिणामार्गे महाद्वारापर्यंत निघाली होती. दिंडीच्या स्वागतासाठी सूर्यनारायणही सज्ज होत होता. पूर्व क्षितिजावर केशरी रंगाची छटा दिसू लागली होती. पहाटेच्या सहाच्या सुमारास पक्ष्यांची किलबिल आजूबाजूच्या झाडांवरून ऐकू येत होती.

श्री व्यंकम्मा मातेच्या मंदिराच्या बाहेर पडल्यावर उजव्या हाताला वळल्यावर प्रदक्षिणामार्गे महाद्वारापर्यंत जाताना “भासे एकचि हे दो अंग” हे पद म्हटलं गेलं. उगवत्या सूर्याबरोबर दिंडीच्या पुढे असणाऱ्या गावातील मुलांच्या अंगात जणू नवचैतन्यच संचारलं होतं. रात्रभर दिंडीतील भजनानंदाची लयलूट केल्यावरसुद्धा कोणत्याही प्रकारची ग्लानी कोणाच्याही चेहर्‍यावर दिसत नव्हती. दिंडीच्या सुरुवातीचा उत्साह प्रत्येकात अजूनही तसाच कायम होता किंबहुना तो अधिकच दुणावला होता. श्रीप्रभुच्या चैतन्याची ही वेगळीच मिसाल होती. हा अनुभव अत्यंत स्फूर्तिदायक होता. पुढे महाद्वारापासून जुन्या वाड्यापर्यंत चालताना “ब्रह्म मूल जग ब्रम्ह ब्रम्ह जग अहं ब्रम्ह मतवाला है” आणि “गुरु वचना कानी घेऊया, जगी अखंड मुक्ताची राहू” तसेच “ऐका विनवणी तुम्ही संतभूप” ही पदे म्हटली गेली. झांज आणि ढोलकीचा आवाज अगदी टिपेला पोहोचला होता. पूर्वी असलेल्या जुन्या वाड्याच्या उत्तरद्वारात “जय देव जय देव दत्ता अवधूता” श्री दत्तात्रेयांची आरती म्हटली गेली. सूर्यनारायण आता क्षितिजावर आपले अस्तित्व दाखवू लागला होता. त्याचं ते केशरी बिंब निळाशार आकाशामध्ये अधिकच मोहक वाटत होते. दिंडी आता श्री सिद्धराज प्रभुंच्या समाधीसमोर आली होती. येथे “देव जय देव जय सिद्ध राजा” श्री सिद्धराज प्रभुंची व तद्नंतर “जय देव जय देव जय गुरु मार्तंडा” ही मार्तंड माणिक प्रभुंची आरती म्हणून झाली. श्री सिद्धराज प्रभु समाधी आणि मुक्तिमंटप ह्यामधील मोकळ्या जागेत दिंडी मधले सहभागी सर्व जण आले होते. येथे श्री सिद्धराज माणिक प्रभु विरचित “प्रभु मजकडे कां ना पाही रे” हे पद म्हटलं गेलं. येथे भजनानंदात उस्फूर्त उड्या मारणाऱ्या प्रभुभक्तांचा जोश काही वेगळाच होता. घड्याळाचा काटा जसा पुढे सरकत होता, तशी दिंडीची ही नशा प्रत्येकास मदमस्त करत होती. त्यातच “येई चेतन सांबा मन हे आवरी, हृदयाकाशी उठती मी मी लहरी” हे मार्तंड माणिकप्रभुंचं अद्वितीय पद म्हटलं गेलं. ह्या पदाच्या शेवटी सकलमत प्रभु नांदे जिकडे तिकडे, अशी ओळ आहे. दिंडीमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक जण आता प्रभुमयच झालेला होता. मुक्तिमंटपासमोरील नवीन पायऱ्यांवरून उतरताना “मी पण गेल्या हा देह जावो वा चिर राहो” हे पद गायलं केलं. पुढे समोरील मातोश्री लक्ष्मीबाई उद्यानामध्ये “सुरत खूब अजब दरसायो, राजा चेतन हर घट अपनी” हे पद म्हटलं गेलं. एव्हाना सूर्य बराच वर आला होता. साधारण आठचा सुमार असावा. मंदिरात आलेले प्रभुभक्त श्रीजींचा आशीर्वाद घेण्यासाठी उद्यानात आले होते. श्रीजीही त्यांना अतिशय उत्साहात भेटत होते. नाना प्रकारच्या पुष्पमाळा श्रीजींना अर्पण केल्या जात होत्या. बुक्क्याची उधळणही अविरत सुरूच होती. सकाळच्या सुखद वातावरणात बुक्क्याचा तो सुगंध मनास अधिकच प्रसन्न करीत होता. माथ्यावर छत्र धरलेली श्रीजींची मूर्ती अतिशय लोभस वाटत होती आणि कित्येकदा अशाच प्रकारे नगरप्रदक्षिणेला निघालेले साईबाबा मला त्यांच्यात दिसत होते… बाबांची नगरप्रदक्षिणाही अशीच असावी, अशी अनुभूती मात्र मला दिंडीच्या निमित्ताने मिळत होती.

क्रमशः…

वेदांत सप्ताह भाग नववा

साहेब, चहा आला, ह्या आवाजाने आज सकाळी जाग आली. अत्यंत कर्तव्यतत्पर सेवेकरी, चहा आल्यावर यात्री निवासातील प्रत्येक खोलीत जाऊन रोज वर्दी द्यायचा. झटपट तोंड धुवून चहा प्यायला हजर झालो. आज आणखी काही प्रभुभक्त आपापल्या घरी रवाना होणार होते. सर्वांशी आपुलकीने गप्पा मारल्या. काल पारायण संपले होते आणि श्रीजींच्या वेदांत प्रवचनांचीही सांगता झाली होती. त्यामुळे आज सकाळी काय करावे? हा प्रश्न अनाहुतपणे मनात डोकावला. कालच्या प्रवचनाला थोडेफार ओवीबद्ध केलं आणि मन संगमावर धावू लागलं.

गुरुगंगा आणि विरजा नदीचा संगम. श्री माणिकनगरातलं एक अत्यंत शांत, मन प्रसन्न करणारं ठिकाण. माणिक नगरातील वास्तव्यात मी अनेक तास येथे घालवले आहेत. झटपट स्नान उरकून मी संगमावर आलो. आज अनेक प्रकारचे पक्षी येथे उपस्थित होते. कडूलिंबाच्या झाडावरला मोर, कडूलिंबाच्याच झाडावर दंगामस्ती करणारे अनेक हरेवा, उगाचच इकडून तिकडून उडणारे बुलबुल, गुरु गंगेच्या पात्रात विहीरणारी बदके, वडाच्या झाडावर अत्यंत सावधपणे बसलेले, आणि माझ्या थोड्या हालचालीने ही दुसरीकडे जाऊन बसणारे पांढरे घुबड, संगमाजवळील पाणथळीच्या जागेत असलेला खंड्या, पाण्यात डुबकी मारून मासे टिपण्यात व्यस्त असणाऱ्या टिटव्या, ह्या सर्वांना पाहताना तासभर कधी निघून गेला कळलेच नाही. श्री तात्यामहाराज आणि श्री दादामहाराज ह्यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. पुष्करणी तीर्थातील पाण्यात वडाचं सुंदर प्रतिबिंब पडलं होतं. हे तीर्थ अत्यंत शोभिवंत असून येथे पाण्यामध्ये पाय सोडून येथील नीरव शांततेचा अनुभव घेणं अतिशय सुखद असतं. पक्ष्यांची किलबिल मनास मोहून टाकत असते, मंद वाहणाऱा वारा वडाच्या पानांशी खेळत असतो आणि त्या मस्तीतच एखादं पान अलगद हेलकावे खात पुष्करणी तीर्थात येऊन विसावतं. निसर्गाच्या प्रत्येक कृतीत आनंद ओतप्रोत भरलेला आहे पण तो अनुभवायला आपल्याकडे सवड मात्र हवी. संगमावरून थेट श्री व्यंकम्मामातेच्या मंदिरात गेलो. सकाळी नीरव शांतता होती. सद्गुरु श्रीमाणिक प्रभुंची व्यंकम्मा ही एक निस्सीम शिष्या. आपले संपूर्ण आयुष्य श्री माणिक प्रभुंच्या चरणी अर्पण करून ब्रह्मपदास पोहोचली. श्री प्रभुचरित्रातील श्रीव्यंकम्मा मातेचे अनेक प्रसंग डोळ्यासमोर तरळले. ह्या स्थानाला श्रीमाणिकनगरचे शक्तीपीठही म्हणतात. श्री दत्तात्रेयांची मधुमती शामला शक्ती म्हणजेच श्रीदेवी व्यंकम्मा…‌ लेकराने जसे आपल्या आईच्या कुशीत घुटमळत राहावे तसे मंदिरात घुटमळलो. ह्या मंदिराचे बांधकाम ही अतिशय सुबक आहे. येथेही माझे मन छान रमते. श्री व्यंकम्मा मातेच्या मंदिरातून निघून बाजूला असलेल्या श्री मारुतीरायाला भेटलो. श्री प्रभुमंदिरात येऊन श्रीप्रभु समाधीचे मनोभावे दर्शन घेतले आणि नागाई (श्रीजींचे निवासस्थान) येथे श्रीजींची नित्यपूजा पाहण्यासाठी आलो.

आज श्री समर्थ रामदास स्वामींचे ११वे वंशज श्री भूषणमहाराज श्रीप्रभु दर्शनार्थ श्रीमाणिकनगरी आले होते. ह्या निमित्ताने सज्जनगड येथील श्री रामदास स्वामी संस्थानाचा, श्री माणिकप्रभु संस्थानाशी अशी असलेला स्नेहसंबंध अनुभवायास मिळाला. श्रीजींच्या नित्य पूजेनंतर आज श्रीनृसिंह निलय येथे सत्संग व उद्बोधनाचा कार्यक्रम होईल असे सांगितले गेले. नित्य पूजेचा तीर्थप्रसाद घेऊन श्री नृसिंह निलयमध्ये जाऊन बसलो. परंपरेप्रमाणे भक्तकार्य कल्पद्रुमच्या गजरात श्रीजींचे व्यासपीठावर आगमन झाले. श्रीजींचा नातू चि. प्रज्ञानराज ह्याच्या उपनयन संस्काराच्यावेळी काही कारणास्तव उपस्थित न राहता आल्यामुळे, त्याला आशीर्वाद देण्यासाठी श्री भूषण महाराज आज खास वेळ काढून श्री माणिकनगरला आले होते. श्रीजींनी त्यांचे अत्यंत स्नेहपूर्वक स्वागत केले. तसेच श्री भूषण महाराजांनीही आपला श्री प्रभुपरिवाराप्रती असलेला स्नेह भेटवस्तू वगैरे देऊन व्यक्त केला. त्यानंतर श्री भूषण महाराजांनी आपले मनोगत अगदी मोजक्या शब्दांत पण अत्यंत संयतपणे व्यक्त केले. श्री भूषण महाराजांना ऐकणे ही कानाला एक मेजवानीच होती. योगायोग असा की श्री भूषण महाराजांच्या मनोगताचे सार हे श्रीजींनी प्रवचन सप्ताहात केलेल्या विवेचनाचेच सार होते. दोन्ही तत्त्वांत एकवाक्यता होती. “सर्व रूपे हा श्री प्रभु जाण” ह्या उक्तीची प्रचीती वारंवार मिळत होती. श्रीजींनी सुरुवातीलाच सांगितले होते की, मी श्री भूषण महाराजांचे स्वागत करणार नाही, कारण श्री समर्थ रामदासांची पूर्वज हे बिदर येथीलच होते त्यामुळे माणिक नगर हे त्यांचेच घर आहे. ही नवीन माहिती श्रीजींकडून ऐकायला मिळाली. श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या पदांतूनही दासबोधाची शिकवण डोकावत राहते किंवा शनिवारच्या सप्ताह भजनामध्ये ही रामदास स्वामींचे पद ऐकायला मिळते. दोन संस्थानात मधील असलेले सामंजस्य आणि स्नेहभाव पाहून मन कृतार्थतेचा अनुभव करत होतं.

काल माणिक क्विझमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धक म्हणून नाव दिलं होतं. महाप्रसादानंतर माणिक क्वीझमध्ये भाग घेतलेल्या स्पर्धकांना आवश्यक त्या सूचना देण्यासाठी जमण्यास सांगण्यात आले होते. महाप्रसादानंतर सर्व स्पर्धक श्रीजींच्या घरी जमले होते. सात जोड्या मिळून एकंदरीत १४ जणांनी स्पर्धेत भाग घेतला होता. स्पर्धेचे स्वरूप काय, स्पर्धेचे नियम काय? कोणकोणत्या टप्प्यात स्पर्धार्धा कशी पार पडेल? ह्याचे सर्व स्पष्टीकरण श्री चैतन्यराज प्रभुंनी केले. साडेसहा वाजता स्पर्धा सुरु होणार होती. तोवर तीन तासांमध्ये काय वाचू आणि काय नको असे झाले होते. आज रात्री ह्या वेदांचा सप्ताहाचे आकर्षण असणारी दिंडीही होती. श्री माणिकनगरच्या सर्वच मंदिरांमध्ये, मुक्तीमंटपात, गावात व श्रीजींच्या निवासस्थानी दिंडीची जय्यत तयारी चालली होती. संपूर्ण रात्रभर चालणाऱ्या ह्या दिंडी करता थोडा आराम करावा की स्पर्धेची तयारी करावी ह्या संभ्रमात असतानाच श्री प्रभु समर्थ म्हणून स्पर्धेच्या तयारीला लागलो.

माणिक क्विझ… आपण श्री माणिक प्रभु व त्यांच्यानंतरचे पीठाचार्य, तसेच श्री माणिकप्रभु संस्थान आणि त्यांचे उपक्रम, कार्य ह्याबाबत किती जाणतो, ह्याबद्दलची खेळाखेळातून साकारलेली प्रश्नमंजुषा. संध्याकाळी साडेसहा वाजता श्री प्रभुमंदिराच्या पटांगणात माणिक क्विझला सुरुवात झाली. समोरचे पटांगण प्रभुभक्तांनी अगदी फुलून गेले होते. रवि, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि अशा सात टीम्स यात सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे पूर्ण सूत्रसंचालन श्री चैतन्यराज प्रभुंनी केले. पहिल्या फेरीमध्ये चार भाग होते आणि त्यातून मिळालेल्या गुणांच्या आधारावर पहिल्या चार जोड्या अंतिम फेरीत प्रवेश करणार होत्या. पहिल्या फेरीत श्री प्रभुचरित्रामधील बारकाव्यांबद्दल प्रश्न होते. आपण श्रीप्रभुचरित्र केवळ वाचतो की अगदी समरसून वाचतो? त्यावर मनन चिंतन करतो का? आपण त्याचे पारायण करतो का? आणि पारायण करून श्री प्रभु आपल्याला किती समजले? ह्याचा एक सुंदर परिपाठ श्री माणिक क्विझ घालून देते. त्यानंतर श्रीप्रभुपदे, पीठाचार्यांचे दौरे, श्री प्रभुमंदिर परिसरातील वेगवेगळ्या चिन्हांचे चित्र आणि व्हिडीओ दाखवून त्याबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. श्री प्रभु संस्थानाचे कार्य ह्याबाबतीत आपल्याला किती माहिती आहे? आपण श्री संस्थानाशी किती आत्मीयतेने जोडले गेले आहोत? याचीसुद्धा जाणीव ह्या क्विझच्या माध्यमातून आपल्याला होत असते. प्रश्नमंजुषेदरम्यान प्रेक्षकांनाही प्रश्न विचारले जायचे किंवा स्पर्धकांना न देता आलेले प्रश्न प्रेक्षकांना विचारले जायचे. बरोबर उत्तर देणार याला चॉकलेट बक्षीस मिळाले. दोन फेऱ्यांमध्ये श्री माणिकप्रभु संस्थानच्या पिठाच्यार्यांच्या लीला आणि त्यांचे सामाजिक कार्य यांचे माहितीपर लघुपट दाखवले जायचे. स्पर्धकांना प्रत्येक फेरीमध्ये उत्तरासाठी त्यांना दहा सेकंदाचा वेळ दिला जायचा. एखाद्या स्पर्धकाला जर त्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही तर तो प्रश्न दुसऱ्या स्पर्धक आकडे अग्रेषित केला जायचा. त्याचे अधिकचे गुण त्या त्या जोडीला मिळायचे. पहिल्या फेरीअखेर आमची जोडी चौथ्या क्रमांकावर होती. अंतिम फेरीसाठी ही पहिल्या फेरी प्रमाणेच प्रश्न विचारण्यात आले.‌

अंतिम फेरीत गुणांनुसार आमच्या शुक्र जोडीला द्वितीय पारितोषिक मिळाले. पारितोषिकातली माझ्या वाट्याची रक्कम एक रुपया प्रसादरुपी घेऊन बाकीची अन्नदानासाठी देऊनही टाकली. ज्ञान आणि खेळाचा सुंदर संगम ह्या माणिक क्विझमध्ये पाहायला मिळतो. गुरुगंगा आणि विरजेचा संगम, श्री माणिक प्रभू संस्थान म्हणजे ज्ञान आणि भक्तीचा संगम, माणिक क्विज म्हणजे ज्ञान आणि खेळाचा संगम, श्री प्रभुचा आणि आपला संगम, मन आणि बुद्धीचा संगम, आपल्या मनातील द्वैत भावनेचा संगम होऊन, ऐक्य भावनेची नदी सकलमत संप्रदायाच्या अंगीकराने खळखळ वाहू लागते आणि सर्व रूपांमध्ये श्रीप्रभुच दिसू लागतो. श्री माणिकप्रभु संस्थानाने खेळांना नेहमीच प्राधान्य दिलेले आहे व आजही देत आहेत. श्री माणिकप्रभु संस्थानचे पीठाचार्य वेळोवेळी आपल्याला स्वतः खेळांमध्ये रमलेले दिसतात. समाजात, मानवांत खेळभावना आणि अंगी खिलाडूवृत्ती जोपासण्याचे महत्वाचे कार्य श्री संस्थांकडून अविरतपणे जपले जाते. ह्या माणिक क्विझच्या निमित्ताने आपण श्रीप्रभुला किती जाणतो आणि आपल्याला आणखी अध्ययनाची किती आवश्यकता आहे? याची जाणीव ह्या क्विझच्या माध्यमातून झाली. सुमारे तीन सव्वातीन तास हा खेळ रंगला. त्यानंतर श्रीजी यांच्या घरी भक्त कार्य झाले. भक्तकार्यानंतर कोल खेळला गेला. श्री माणिकनगरच्या आबालवृद्धांसहित सर्वच लोक (विवाहानंतर सासरी गेलेल्या मुलीसुद्धा) आजच्या, दिंडीच्या दिवशीच्या कोलसाठी आवर्जून हजर असतात. पूर्वी हा खेळ आनंदमंटपात खेळला जायचा, पण वाढत्या संख्येमुळे श्री प्रभुमंदिर पटांगणात खेळला जाऊ लागला. कोलनंतर गोप व फुगडी इ. सुद्धा असते. श्री माणिकनगरचे अनुभवी व वृद्ध लोकसुद्धा या दिवशी कोल खेळतात. या दिवसाच्या कोलध्ये एक वेगळाच जोश अनुभवायास मिळतो. कोलनंतर ‘नम: पार्वतीपतये’ च्या जयघोषात समाप्ती झाली. मन आनंद सागराच्या लहरींवर उचंबळत होते. आणि आता प्रतीक्षा होती ती, ज्याचे वर्णन “नाही स्वर्गी वैकुंठी हे सुख” असे केले आहे ती दिंडी, सदेही अनुभवण्याची…

क्रमशः…

वेदांत सप्ताह भाग आठवा

आज पहाटे साडेपाचलाच जाग आली. जेमतेम पाच तासही झोप झाली नाही, पण तरीही मन प्रसन्नतेची अनुभूती करत होतं. आज पारायणाचा शेवटचा दिवस होता, श्रीजींच्या वेदांत सप्ताहातील प्रवचनाचाही शेवटचा दिवस होता. आज चहाच्या चर्चेदरम्यान जाणवले की, अनेक जणांना परतीचे वेध लागले होते. काहीजण आजच संध्याकाळी निघणार होते तर काहीजण उद्या सकाळी निघणार होते.‌ काही जणांचा बिदरला जायचा बेत ठरला होता. काहीजण दिंडीसाठीही थांबणार होते. गेल्या आठवड्याभरात अनेक प्रभुभक्तांशी जिव्हाळ्याचे नाते जोडले गेले होते. कोणीतरी चिवडा, चकल्या खायला बोलवत होते. काहीजण एकमेकांचे पत्ते, मोबाईल नंबर घेण्यात व्यस्त होते. पुढल्या वेळेस कुठे, कधी, कसे भेटावे? त्याचेही नियोजन चालू होते. आज मी सगळ्यांसाठी भरपूर वेळ दिला. स्नान उरकून माणिक विहारमध्ये नाश्ता उरकला आणि श्रीप्रभुमंदिराची वाट धरली. आज रस्त्यात साथीला वानरसेना होती.  निलगिरीच्या झाडांवर वटवाघळे विराम करत होती. गुरुगंगेच्या पात्रात अनेक बदके विहरत होती. टिटव्या पात्रातल्या झुडूपांमध्ये खाद्य शोधत होत्या. दूरवर आंब्याच्या झाडावर एक मोर बसला होता. एकंदरीत सृष्टीतला प्रत्येक जीव आपापल्या कामात व्यस्त होता. कालाग्नी रुद्र हनुमानाचे दर्शन घेऊन औदुंबराखाली पारायणासाठी पोहोचलो.

आज पारायणाला बसतानाच मन भरून आले होते. श्री राघवदास रामनामे विरचित श्री माणिक चरितामृत इतके रसाळ आणि गोड आहे की, चरित्रनायक श्री माणिकप्रभु कधी आपल्या हृदयाचा ठाव घेतात, ते आपल्यालाही कळत नाही. ह्या चरित्राच्या वाचनानंतरच मी श्री माणिकप्रभुंच्या अंतर्बाह्य प्रेमात पडलो.‌ श्री माणिकप्रभुंच्या लीलांचे वर्णन करताना ग्रंथकार आपल्याला केवळ त्या चमत्कारांमध्येच गुंतवून न ठेवता योग्य तो जीवन उपदेशही देतात. ह्या ग्रंथाच्या पारायणाने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असे म्हटले आहे. त्यावर भाष्य करताना श्री ज्ञानराज माणिकप्रभु पोथीतील आपल्या प्रस्तावनेत म्हणतात की, मनोकामना पूर्ण होणे म्हणजे काय? मनोकामना पूर्ण करून घेण्यामागे मूळ उद्देश कोणता? मनांत कामनेचा उदय झाला म्हणजे चित्तचांचल्य होऊन एक प्रकारची उद्विग्नता निर्माण होते. मनोकामना पूर्ण झाल्यावर ती उद्विग्नता समाप्त होऊन, मन स्वस्थानी उपरम पावते. मनाचे स्वस्वरूपाशी तादात्म्य होताच, आनंदाची अनुभूती मिळते. आपल्याला असे वाटते की, इच्छित वस्तू मिळाल्यामुळे मला आनंद झाला, पण वस्तुस्थिती तशी नाही. कामनेचे शमन झाल्यामुळे आपणांस आनंद होत असतो, कामनेच्या पूर्तीमुळे नव्हे. कुठलीही कामना पूर्ण करण्यासाठी किती खटपटी लटपटी कराव्या लागतात हे सर्वांस विदित आहेच. म्हणून शहाण्यांनी कामना पूर्ण करण्याच्या भानगडीत न पडता, आपल्या सर्व कामनांचे शमन होऊन आपण निष्काम कसे होऊ याकडे लक्ष दिले पाहिजे.

श्री माणिक चरित्रामृत म्हणजे चैतन्याचा अखंड वाहणारा झरा किंवा थुई थुई उडणारे आनंदाचे कारंजेच. शिखाचे मुडूप, काशी यात्रेच्या ब्राह्मणाची कथा, फकीराचा लोभ तेलंगणाचा अय्या, बयाम्मामातेचा पोटशूळ अशा अनेक प्रभुलीला अनुभवताना श्रीप्रभुंच्या अवतार समाप्तीचे प्रकरण सुरू होते. दादा महाराज (थोरले बंधू), तात्या महाराज (कनिष्ठ बंधू), देवी बयाम्मा माता (श्री माणिक प्रभुंची आई) आणि देवी व्यंकम्मामाता (श्रीमाणिकप्रभुंची पट्टशिष्या) ह्यांचे निर्वाण अंतःकरण हेलावून टाकते. त्यानंतर श्री माणिकप्रभूंचे धीरोदत्तपणे संजीवन समाधी घेणे हे आपल्याला अंतर्बाह्य गलबलून टाकते. नकळत डोळ्यांतून येणारे अश्रू श्री माणिक चरितामृताची पाने भिजवून जातात. केवळ पारायण करताना आपली ही अवस्था होते, तर श्री माणिकप्रभु संजीवन समाधीच्या वेळेस भक्तांची काय अवस्था झाली असेल बरे? कल्पनेनेच अंगावर शहारा येतो. दत्तजयंती अगदी चार दिवसांवर असताना मोक्षदा एकादशीच्या दिवशीच श्रीप्रभु संजीवन समाधीत उतरले. श्रीप्रभुंचे जीवन समाधी प्रकरण ग्रंथकर्त्याने अत्यंत उत्कटतेने लिहिलेले आहे. ग्रंथ लिहिण्यापूर्वी ग्रंथकार श्री राम नामे हे श्रीप्रभु सांप्रदायिक नव्हते किंवा चरित्रलेखनापूर्वी ते कधी माणिक नगर असली आले नव्हते. सुरुवातीला श्री माणिक प्रभु कोण? कुठले? त्यांचे चरित्र काय? हे माहीत नसतानाही हा दिव्य ग्रंथ त्यांच्या लेखणीतून श्री प्रभू कृपेनेच लिहिला गेला ह्यापेक्षा आणखी मोठा चमत्कार काय असू शकतो? मला वाटते प्रत्येक दत्तभक्ताच्या संग्रही श्री माणिक चरितामृताची ही दिव्य पोथी अवश्य असावी. भावनेच्या लाटांवर स्वार होत असतानाच पारायणाची समाप्ती झाली. कोण्या एका भक्तांने अकरा रुपये आणखी एका भक्तांने एकविस रुपये दक्षिणा म्हणून पोथीवर ठेवले. आजही ते बत्तीस रुपये श्रीप्रभुचरित्रातच ठेवले आहेत. आजही चीकू, खडीसाखर आणि पेढे मिळाले. श्री प्रभुभक्त सद्भावनेने पोथीजवळ आणून ठेवतात. आजही तोच समाप्तीचा नैवेद्य म्हणून श्रीप्रभुला अर्पण केला. आरत्या म्हटल्या आणि हे महाचरित्र निर्विघ्नपणे सफळ संपूर्ण करून घेतल्याबद्दल प्रभुदयाघनाचे मनोमन आभार मानले. पारायण ठिकाणाची आवराआवर करून श्रीप्रभु मंदिरात दर्शनाला आलो.

मोरपिसी रंगाच्या नक्षीदार महावस्त्रावर नाजूक वेलबुट्टीची भगवी शाल आज श्रीप्रभुचे रूप अत्यंत खुलवत होती. तुळशीमाळा, बोरमाळा, वैजयंतीमाळा, मोहनमाळा, मोत्यांच्या माळा, नवरत्न माळा, रुद्राक्ष माळा,  सोन्याच्या माळा श्रीप्रभु गळाभर आनंदाने मिरवत होता.‌ निशिगंध आणि गुलाबाचा भरगच्च हार जणू हाती झारी घेऊन सुगंध शिंपडत होता. समाधीवरील जास्वंदीची फुले आणि पिवळ्या झेंडूच्या माळा आपल्या परीने त्या रंगसंगतीत अधिकच भर घालीत होत्या. प्रभु जात्याच सुंदर आणि प्रभुची सजावटही सुंदर…‌ ह्या नितांत सुंदर श्रीप्रभुदर्शनाने मन भरून आले आणि सहजच श्रीप्रभु चरणी लीन झालो. पुन्हा एकदा श्रीप्रभुचरणी कृतज्ञता व्यक्त करून, श्रीप्रभुसमाधीस प्रदक्षिणा घातल्या आणि यात्री निवासावर आलो. पारायणाचे व्यासपीठ, पोथी वगैरेची आवराआवर करून श्रीजींच्या घरी पूजेस आलो. श्रीजींच्या घरी नित्य पूजेचे तीर्थ घेऊन परत श्रीनृसिंह निलयमध्ये प्रवचनासाठी येऊन बसलो.

आज श्री मद्भगवद्गीतेच्या सतराव्या अध्यायाच्या समाप्तीचे प्रवचन होते. श्रीजींनी काल ॐ तत् सत् ची जुजबी ओळख करून दिल्यावर आज त्याच ॐ तत् सत् च्या व्यापक स्वरूपाला जाणण्यासाठी मन आतुर झाले होते. प्रथेप्रमाणे माध्यान्ह काळी भक्तकार्य कल्पद्रुमच्या गजरामध्ये श्रीजींचे व्यासपीठावर आगमन झाले. आज श्रीजींनी २४ ते २८ ह्या पाच श्लोकांचा गूढार्थ समजावून दिला.

सुरुवातीलाच गीता म्हणजे गीत, गीता म्हणजे परमेश्वराने गायलेले गीत. गाण्यामध्ये मोठ्यात मोठ्या गोष्टीला कमीत कमी शब्दात बांधण्याची आणि ते हृदयात ठासवण्याची क्षमता आहे. श्रीमद्भगवत गीतेमध्ये माधुर्य आहे म्हणूनच ती हृदयात उतरते. गीतेमध्ये कर्मयोग, भक्तीयोग आणि ज्ञानयोग सांगितला आहे. कर्मयोग आणि भक्तियोग समांतर आहे, असे समजतात. कर्मयोगाशिवाय भक्तीयोगाची पात्रता नाही आणि भक्तीयोगाच्या अनुष्ठानाशिवाय ज्ञानयोगाची प्राप्ती नाही. भक्तियोग साधकांस बांधून ठेवतो, प्रत्येकाने गीतेतून ज्ञानयोग  शिकायला हवा, ह्या ज्ञानयोगानेच मुक्ती प्राप्त होते.

श्रीजींनी पुढे ॐ चे व्यापक स्वरूप समजावताना ॐ म्हणजेच प्रणव, ॐ हेच सर्व मंत्रांचं आदिबीज आहे, चारही वेद हे ॐचेच अख्यान आहे. ॐ कालातीत आहे आणि परमात्माही ॐकारचआहे. जगत् म्हणजे ॐकार, परमात्मा म्हणजे ॐकार आणि म्हणूनच जगत् म्हणजेच परमात्मा. वेदांतातील ह्या संकल्पना जनसामान्यांना अधिकाधिक स्पष्ट व्हाव्यात म्हणून आई जशी आपल्या बाळाला हात धरून चालायला शिकवते, त्याचप्रमाणे श्रीजी सर्वांना आपल्या मधुर वाणीने, पुराण कथांमधील, व्यवहारातील अनेक गोष्टींचे दाखले देत, वेदांताच्या मार्गावर आपला हात धरून, आपल्या संकल्पना स्पष्ट करून, आपल्याला त्या मार्गावर प्रशस्त करतात. ॐला असलेल्या चार मात्रा, अ + उ ह्या गुणसंधीने झालेला ओ, अशी व्याकरणदृष्ट्या फोडही श्रीजी करून सांगतात. एका मुरलेल्या शिक्षकाचचं हे वैशिष्ट्य म्हणावं लागेल. जगताचा अनुभव जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या अवस्थेतून जातो. तसेच अ हा नाभीतूध निघतो, ऊ हृदयातून निघतो आणि म हा जेव्हा दोन्ही ओठ बंद होतात तेव्हा उत्पन्न होतो.‌ ॐ उच्चारण्यावेळी आपल्याला जागृती (अ), स्वप्न (ऊ) आणि सुषुप्तीचा (मी) अनुभव येतो. ॐकार जपते वेळी दोन ॐकारा मधील जागेला (विरामाला) शांती म्हणतात आणि तीच परमात्म्याचे स्वरूप आहे. त्यात परमात्मा प्रकट होतो. तीच तुर्या अवस्था… श्रीजींच्या ज्ञानपूर्ण बाणांनी मनातील अज्ञान तीरोहित होत होते. हाच धागा पकडून श्रीजींनी कोल खेळाचे वर्णन केले. संध्याकाळच्या बालगोपाल क्रीडेमध्ये दोन गोपींबरोबर एक कृष्ण असतो. आणि हा कृष्ण म्हणजेच दोन ॐकारामधली असलेली शांती, ते मौन, तो परमात्मा, ती तुर्या अवस्था… तसेच ॐ हे त्रिमूर्तीचं प्रकटीकरण आहे. विष्णूचं प्रकटीकरण म्हणजे अ,  शिवाचं प्रकटीकरण म्हणजे उ आणि ब्रह्माचं प्रकटीकरण म्हणजे म. अर्थात् ॐ म्हणजेच श्री प्रभु दत्तात्रेय.

विषयाचे स्पष्टीकरण जनसामान्यात व्हावे आणि ते संपूर्णपणे व्हावे ह्याकडे श्रीजींचा पूर्ण कटाक्ष असतो. सर्वांना एका कागदावर वर्तुळ काढायला लावून त्यात आणखीन एक छोटे वर्तुळ काढायला सांगितले. छोटे वर्तुळ हे जगत आणि बाहेरच मोठं वर्तुळ हे परमात्मा. जग हे परमात्म्याचाच एक अंश आहे. परमात्मा अगदी व्यापक, विशाल, अनादी, अनंत आहे ही संकल्पना त्यांनी उपस्थित श्रोत्यांच्या मनावर कायमची बिंबवली. प्रवचनाच्या शेवटच्या टप्प्यावर गीतेचा प्रत्येक अध्याय हे कृष्णाचे उत्तम भाष्य कसे आहे हे समजावून सांगितले. श्रीमद्भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला उपक्रम (start), नंतर सामंजस्य (connection) आणि शेवटी उपसंहार (conclusion) कसा आहे आणि श्रीकृष्णाला जगद्गुरु का म्हणतात हेही छानपणे समजावले. मोक्षाच्या प्राप्तीसाठी देहत्याग ही द्वैती लोकांची धारणा आहे, पण जिवंतपणीच मुक्तीचा अनुभव ज्याला “जीवनमुक्ती” म्हणतात ही सकलमत संप्रदायाची धारणा आहे, अद्वैती जनांचा सिद्धांत आहे. श्री माणिकप्रभुंनी सकलमत संप्रदायाची स्थापना करून आपण जीवन जगत असताना मोक्षाचा अनुभव प्राप्त करून देण्याची जडीबुटीच समस्त जगताला दिलेली आहे. जिवंतपणीच मुक्तीचा अनुभव हे सकलमत संप्रदायाचे हे परमविशेष आहे. श्रीजींचे आजचे प्रवचन संपूच नये असे प्रत्येकास वाटत होते. महाप्रसादाची वेळ झाली होती तरी उपस्थितांमध्ये थोडीही चुळबुळ जाणवली नाही. श्रीजींच्या प्रवचनानंतर उपस्थित जनसमुदायापैकी काहीजणांनी आपले मनोगत व्यक्त केले. मलाही संधी मिळाली, पण ते कधीतरी विस्ताराने लिहेन. पारायणासाठी जमलेल्या सर्व आस्तिक महाजनांना श्रीजींनी शाल आणि खारकांचा प्रसाद देऊन आशीर्वाद दिला.‌ श्रीजींच्या वेदांत सप्ताहातील सतराव्या अध्यायाच्या प्रवचनांचे व्हिडिओ आपल्याला Manik Prabhu ह्या YouTube चॅनेल वर पाहता येतील.

महाप्रसाद घेऊन यात्री निवासावर आलो. निघणाऱ्या सर्व भक्तांच्या गळाभेटी घेतल्या. गुरूमार्गावर जोडलेली नाती निखळ आनंद देऊन जातात. आज संध्याकाळी मुक्तीमंटपाच्या औदुंबराखाली लवकरच येऊन बसलो. श्रीजींचे प्रवचन आठवून ओवीबद्ध करण्याचा प्रयत्न केला. इतके दिवस अवकाळी पावसाचे वातावरण असल्यामुळे आकाश ढगाळ होते. पण आज आकाश अगदी स्वच्छ, निरभ्र होते. श्रीजींच्या प्रवचनामुळे जणूकाही आकाशातील अज्ञानरुपी मळभही दूर झाले होते. आज संध्याकाळी पश्चिम क्षितिजावर विविध रंगांची उधळण पाहायला मिळत होती. श्रीप्रभु चैतन्याचा हा अविष्कर पाहणे ही एक नितांत सुंदर अनुभूती आहे. क्षितिजावरील रंगांच्या ह्या खेळाचा भरभरून आनंद औदुंबराखाली बसून लुटला. भक्तकार्यासाठी श्रीजी आज अतीव प्रसन्नतेने उपस्थित होते. बाहेरगावी जाणाऱ्या भक्तांसाठी खारकांचा प्रसाद दिला गेला.

भक्तकार्यानंतर श्रीप्रभुमंदिर पटांगणात बालगोपाल क्रीडेचा आनंद लुटण्यासाठी आलो. श्रीप्रभुमंदिर पटांगण भक्तजनांनी खचाखच भरले होते.‌ श्रीप्रभुपदांच्या आणि वाद्यांच्या तालावर प्रत्येकजण थिरकत होता. श्रीजींनी प्रवचनात सांगितल्याप्रमाणे दोन गोपींमधला कृष्ण आज प्रथमच कोलदरम्यान अनुभवला. बसल्याजागी  दोन ॐकारामधल्या शांतीतही तो अनुभवला. माझ्या ध्यानातला परमात्मा आणि माझ्यासमोर कोल खेळणारा दोन गोपींमधला परमात्मा एकच निखळ आनंद देत होता. सर्व रूपे श्रीप्रभु जाण… ही अद्वैताची अनुभूतीसुद्धा आज खेळादरम्यान अनुभवता आली आणि या दिव्य अनुभूतीमुळेच कोल खेळाचा आनंद आज अधिकच द्विगुणीत झाला.

संध्याकाळच्या महाप्रसादानंतर भजनासाठी श्रीप्रभु मंदिरात येऊन बसलो. आज शनिवार होता. आज जांभळ्या रंगाची गादी श्रीजींसाठी सजवून ठेवली होती. नेहमीप्रमाणे दिवट्यांच्या प्रकाशात, भक्तकार्य कल्पद्रुमच्या गजरात श्रीजींचे आगमन झाले. आज शनिवार असल्यामुळे भजनाआधी प्रथम आरती झाली. आरतीच्या वेळेस वाद्यांचा कल्लोळ रोम रोम पुलकित करत होता.‌ अवघा जनसमुदाय श्रीप्रभु रंगात रंगला होता. आरतीनंतर श्रीजी प्रवचनासाठी गादीवर स्थानापन्न झाले. आज प्रवचनासाठी “देई मला इतुके रघुराया, मती उपजो तुझिया गुण गाया…” हे माझे अत्यंत आवडीचे पद होते. श्री आनंदराज प्रभुंनी आपल्या दैवी स्वराने ह्या पदाची गोडी अजूनच द्विगुणित केली आहे. अत्यंत सरळ अर्थ असलेल्या पदाचा वेदांतातील गूढार्थ श्रीजींनी रामायणातील अनेक उदाहरणे देऊन समजावून सांगितला. तासाभराच्या प्रवचनानंतर नेहमीप्रमाणे तबला, पेटी, तंबोरा, सनई, यांच्याबरोबरच सुरांची देहभान हरपून टाकायला लावणारी जुगलबंदी अनुभवली. शनिवारच्या भजनामध्ये खूप पदे आहेत. दास्यभक्तीने ओतप्रोत भरलेली ही पदे मनाचा ठाव घेतात. भजनाच्या शेवटच्या टप्प्यावर “भज मना तू भज भज मना, वायुनंदना तू वानर रूपा…” हे पद जेव्हा म्हटलं गेलं, तेव्हा श्रीजींच्या हातातही झांज आले होते. ह्या भजनसंध्येची नशा काही वेगळीच असते, कदाचीत ती शब्दांत समर्पकपणे वर्णन करणे केवळ अशक्यच आहे, पण ज्यांनी ती नशा अनुभवलीय, तेच ह्याची गोडी जाणू शकतात. आजही भजनानंतर कुरमुरे खोबर्‍याचा प्रसाद वाटला गेला. रात्री भजन वाल्यांना श्रीजींनी शाल देऊन आशीर्वाद दिला. आज भजनाच्या वेळी गळ्यात वीणा अडकवलेला एक वारकरी अवचितपणे प्रकट होऊन एका हाती झेंडा व दुसर्‍या हाती चिपळ्या घेऊन श्रीप्रभु समाधीभोवती प्रदक्षिणा घालत होता. आणि शेवटच्या गजराच्या वेळी खूप वेळ घुमत होता. त्या नादब्रम्हामध्ये तो अगदी हरवून गेला होता. भजन रसाने त्या आत्म्याची पूर्ण तृप्ती होत होती. असो, श्रीजींच्या प्रस्थानाच्या वेळी “कमल वदनी हे अमृत भरा, माणिक माणिक मंत्र स्मरा…” पदाच्या दिव्य लहरी एकापाठोपाठ एक आदळत होत्या‌, आणि साऱ्यांच्या नजरा कृतज्ञतेने घराकडे परतणार्‍या श्रीजीरुपी ज्ञानमार्तंडाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे खिळल्या होत्या.

क्रमशः…