‘गुरु: साक्षात्परब्रह्म’ म्हणतात ते खरेच असावे याची प्रचीती आली. सन २०१८ च्या जून महिन्यात आम्ही बदरी-केदार, हरिद्वार यात्रेला एका धार्मिक विचाराच्या गटामार्फत जाऊन आलो. यात्रा निर्विघ्न व सफल व्हावी यासाठी प्रथेप्रमाणे श्रीमहाराजांची परवानगी-आशीर्वाद व प्रसाद घ्यावा म्हणून आम्ही माणिकनगरला गेलो व श्रीजींना ही बाब सांगितली तेंव्हा अनपेक्षितपणे श्री ज्ञानराज प्रभू म्हणाले, “कशाला जाता देसाई?” म्हणजे त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की “कशाला उगाच त्रास करून घेता? ‘‘या वयात ही यात्रा अवघड आहे.” मी जरा चपापलोच! पण मला जायचेच होते, कारण आमच्या काही मित्रांनी यासाठी खूप म्हणजे खूपच आग्रह केला होता व भिडेखातर मला हो म्हणावे लागले. त्यातून आमच्या सौ.बाईसाहेबांचीही फार इच्छा होती. त्यांना कुठे नेणे आजवर जमले नाही किंवा तसे म्हणण्यापेक्षा आमच्या अरसिकतेमुळे नेलेच नाही. असो. श्रीजींना मी माझा भिडस्तपणा व नाइलाजाचे कारण सांगितले. त्यावर ते म्हणाले “ठीक आहे. जाऊन या पण सांभाळून रहा”

पण श्रीजींनी मनातून परवानगी दिली नाही याची जाणीव झाली आणि याची प्रचीति यात्रेत लगेच आली. तिथे केदारनाथला सीतापूरपर्यंत पायथ्याला आम्ही ट्रेनने व बसने कसेतरी पोहोचलो. पण तिथून पुढे १५ किमी केदारनाथापर्यंत घोडे-डोली किंवा हेलीकॉप्टरने जायचे, पण हेलीकॉप्टरच्या फेऱ्या तीन दिवसांपूर्वीच ऑनलाईन अॅडव्हान्स बुकींग पूर्ण झालेल्या होत्या. आता घोडे, डोली किंवा पायी या शिवाय पर्याय नव्हता. घोड्यावर जायला चार तास, परत यायला चार तास व तिथे मंदिराजवळ अडीच ते तीन तास रांगेत, असे अकरा-बारा तास लागणार होते. तरीही जाऊ कसे तरी, म्हणून आम्ही पहाटे तीन वाजता घोड्यांच्या स्थानकावर पोहोचलो. तिथे पोहचताच अॅसिडिटीमुळे किंवा अन्य कशामुळे कुणास ठाऊक मला चक्कर आल्यासारखे वाटू लागले. उजवीकडे खोल दरीत, घोंघावत, तुफान वेगाने धावणारी अलकनंदा नदी व डावीकडे उंचच उंच डोंगराचे भयंकर रूप व मध्ये जाणे-येण्यासाठी फक्त आठ ते दहा फूट रुंदीचा दगडा गोटयांचा रस्ता हे पाहून माझ्या छातीवर भयंकर दडपण आले. तशात आदल्या रात्री पोट साफ होण्यासाठी घेतलेल्या जुलाबाच्या गोळयांनी आपला प्रताप दाखवण्यास सुरूवात केली. मला कमोडची सवय, तिथे साधे टॉयलेट देखील मिळणे दुरापास्त होते. एक होते तिथेही अर्धा – एक तास रांगेत उभे राहावे लागणार होते. मी म्हणालो “आता मेलो.” माझी अवस्था व कण्हणे पाहून सोबतचे इतर लोक चिंतातुर झाले. मी सौभाग्यवतींना म्हणालो, “तुम्ही या लोकांबरोबर जाऊन या, मी रूमवर थांबतो” पण त्यांना ते योग्य वाटले नाही. शेवटी आम्ही दोघेही रूमवर परत आलो. बाकीचे सर्वजण पहाटे तीनला निघून रात्री दहा-साडेदहाला कुंथत-कण्हत-दमून-भागून परत आले व म्हणाले, “देसाई, तुम्ही न आलेलेच बरे झाले. भयंकर हाल झाले. मध्येच वाटेत गारांच्या पावसाने चिंब भिजलोही. जवळ परत आल्यानंतर हॉटेलचा रस्ताही चुकलो. शोधण्यात दीड-दोन तास अंधारात भटकत राहिलो” श्री सिद्धराज माणिकप्रभु महाराज विनोदानें म्हणायचे – ‘‘बरे होते घरी – कुठे आठवली पंढरी’’ याची या यात्रेत मला प्रकर्षाने आठवण झाली.

म्हटले, श्रीजींच्या म्हणण्याची आता खरी प्रचीति आली. तिथूनच केदारनाथाला नमस्कार केला. सगरोळीला घरी आल्यावर सर्वेश्वर मंदिरात केदारनाथरूपी महादेवाची पूजा केली व माणिकनगरला गेल्यावर श्रीप्रभूंच्या प्रांगणातील सर्वेश्वर मंदिरातील महादेव हाच केदारनाथ आहे असे मानून पूजा करण्याचा संकल्प व क्षमायाचना केली.

तिथून घरी परत येताना व आल्यावर सात-आठ दिवस निरनिराळया व्याधींनी आम्ही व आमचे सोबतचे बरेच लोक त्रस्त होते. पण श्रीप्रभूंच्या कृपेने अघटित काही घडले नाही. या प्रसंगातून श्रीप्रभुचरित्रातील श्री विठ्ठलराव शेकदार – सावत्र भावाचे लग्न – “लवकर परत या” असे श्रीप्रभूंचे सांगणे – सावत्र आईचा सावत्रपणाचा हिसका व त्यातून बेतलेले प्राणसंकट व प्रभुकृपेने पुढे ते विठ्ठलराव शेकदार कुटुंब सुखरूप घरी आलेल्या प्रकरणाची आठवण होते. श्रीप्रभूंच्या सांगण्याची सत्यता इथे पटते. या गोष्टींची यावेळी प्रकर्षाने आठवण झाल्याशिवाय राहीली नाही.

आता दुसरी प्रचीति अशी की, बदरीनाथला गेलेवेळी मंदिरात अतोनात गर्दी-चेंगराचेंगरी. बाहेर पडणाऱ्या बर्फाची थंडी व आत मरणाचा उकाडा याला जीव वैतागून गेला. मंदिर व्यवस्थापनाला शिव्या देण्यातच मन गुंतून गेले. रेटारेटीत कसेतरी श्री बदरीनाथाचे ओझरते दर्शन झाले. प्रसाद समोर ठेवला, तो पुजाऱ्याने घेऊन तो प्रसादाचा पुडा न फोडता लगेच माझे हातात कोंबला व ढकलाढकलीत तसेच पुढे ढकलले जात श्री बदरीनाथांच्या मूर्तीकडे पहात आम्ही बाहेर पडलो. म्हटले, एवढा आटापिटा करून नीट दर्शनही झाले नाही. मग पुन्हा रांगेत गेलो. तेंव्हा दुपारचे नैवेद्य व आरतीसाठी दार बंद झाले होते. गर्दी कमी दिसत होती म्हणून परत दाराजवळ जाऊन उभे राहिलो. तो मधमाश्यांचे पोळ उठल्याप्रमाणे कुठून लोक आले कुणास ठाऊक, पण दार उघडताच रेटारेटी परत सुरू झाली. पण यावेळी कसे डोक्यात आले कुणास ठाऊक, रामेश्वर यात्रेला जाताना श्री ज्ञानराजप्रभू आपल्या प्रवचनात म्हणाले होते, “माणिकनगरला श्रीप्रभूंच्या रूपात सर्व ठिकाणच्या देवता आहेत. मग यात्रा कशाला? असे सर्वजण म्हणतात. श्रीप्रभूंच्या रूपात इतर सर्व क्षेत्रदेवता पाहणे सोपे आहे पण सर्व क्षेत्रात त्या त्या देवतांच्या ठिकाणी श्रीप्रभूंना पाहणे अवघड आहे. हीच खरी भक्ती व श्रद्धा होय. ही श्रध्दा जडवून घेण्यासाठी यात्रेलाही जाऊन यावे.”

मग हा विचार त्या गर्दीतही मनात आला व बदरीनाथाच्या मूर्तीजवळ येताच बदरीनाथाच्या ठिकाणी श्रीप्रभूंचे रूप आठवले. श्रीप्रभूंच्या रूपात बदरीनाथाला पाहिले, नमस्कार केला अन् काय आश्चर्य नेहमीप्रमाणे आमच्या आई वडीलांचा फोटो हातात घेऊन श्रीप्रभुरूपी बदरीनाथाला नमस्कार केला. त्याचवेळी ध्यानीमनी नसतांना माझेकडून हे दुसऱ्यांदा दर्शन म्हणून, हार-फुले किंवा प्रसादाचे काहीही बरोबर नेले नसताना देखील आम्ही आई-वडिलांच्या फोटोसह डोके टेकवले. तिथल्या पूजाऱ्याने जवळच पडलेला एक हार घेऊन आमचे आई वडीलांच्या फोटोला घातला व आमचे हातावर त्यांचेकडचा प्रसादही दिला. अकल्पितपणे हे घडून गेले. मी इतका आनंदित व प्रभावित झालो आणि श्रीजींच्या त्या दिवशीच्या प्रवचनाची आठवण झाली. म्हटलं यात्रा सफल झाली. समाधान वाटले. या प्रसंगी श्रीप्रभुचरित्रातील रामेश्वर यात्रा- कावड- प्रभुला अभिषेक तसेच तुळजापूरवासिनीची प्रभुरूपात पूजा या प्रकरणाची आठवण झाली.

अशी ही ‘प्रचीति गुरुतत्त्वाची’ आहे. श्रीसिध्दराजप्रभूंना वाचासिध्दी होती. त्या ‘सिध्दांच्या’ वाचेला आता ‘ज्ञानाची’ झालर लागली आहे ही खूप मोठी प्रासादिक बाब आहे. श्रीप्रभुकृपेने सर्वांचे कल्याण होवो व श्रीप्रभुचरणी आमची अनन्य भक्ती वृद्धिंगत होवो हीच श्रीप्रभुचरणी प्रार्थना.

[social_warfare]