तोच भैरव हा माणिक

सोनपिवळी जेजुरी
सोनपिवळे मैलार
सोन्याहुनही सोनेरी
अमुचे माणिकनगर

तिथे अश्वावर स्वार
हाती आयुध शोभे खंड
इथे शिळेचा आकार
पुढे मांडुनि योगदंड

शक्तिरूपिणी म्हाळसा
तेथे शोभे अर्धांगिनी
मधुमती शक्ति व्यंका
येथे परम योगिनी

तिथे खंडोबा, मार्तण्ड –
कुलदैवताचे रूप
कल्पतरु प्रभु माणिक
इथे सद्गुरु स्वरूप

तिथे भंडारा उधळण,
वारी, बुधली-दिवटी
इथे नित्य उपासन
जे ज्या दैवता आवडी

“येळकोट येळकोट”
गजर तेथे “जय मल्हार”
“भक्तकार्य कल्पद्रुम”
येथे “माणिक शिव हर”*

तिथे भव्य युद्ध-वेषे
मणि-मल्लांसी मारिले
इथे सकलमत संदेशे
वैमनस्यासी हारिले

खंडेराय श्री माणिक
भिन्न-भिन्न जरी वाटत
खरे पाहु जाता एक
विप्र बहुधा वदत

आपुले आत्मस्वरूप
तोच भैरव हा माणिक
चित्त शिघ्र हो तद्रूप
नसे मागणे आणिक

घडो निरंतर श्री गुरु सेवा

गुरु ही पार लगावे नैया
गुरु ही भवसागर खेवैया!
गुरु चरन में शीश नवाऊँ
गुरु बिन ज्ञान कहाँ मैं पाऊँ|

गुरु पौर्णिमेच्या मंगल प्रसंगी परमपूज्य सद्गुरु श्री ज्ञानराज माणिक प्रभु महाराजांच्या चरणी अनंत कोटि नमन तसेच त्यांस अनेकानेक सुमंगल शुभेच्छा🙏🏻

खरे पाहता ज्याच्या सन्मानार्थ एखादा दिवस विशेष साजरा होतो, त्या व्यक्तिस त्या दिवशी भेट दिली जाते. परंतु सद्गुरुच कर्ता करविता दाता त्राता आहे अशी दृढ श्रद्धा असलेल्या आम्ही भक्तांनी श्री महाराजांस भेट तरी काय द्यावी? उलट पक्षी आजच्या ही दिवशी आमचे हात पसरलेलेच!

तरी परंतु श्रीजींच्या प्रति असलेले सादर प्रेम मात्र आज व्यक्त केल्यावाचुन रहावत नाही. ही भावसुमनांची भेट त्यांनी गोड मानून घ्यावी.

अर्थात ह्या काव्यातही मागणेच आहे. परंतु “परमेश्वराकडे काय मागावे” ह्या विषयी श्रीजींकडून मिळालेल्या धड्याचा अभ्यास करायचा प्रयत्न सतत चालू असतो. त्या अनुषंगाने ह्या काव्यात गुरुची सेवा याचिली आहे.
श्रीजींकडून वारंवार लाभलेल्या ज्ञानामृतातून गुरुसेवेचा जो अर्थ मला उमगला, त्यानुसार गुरुसेवा ही दोन मुख्य वर्गात विभागता येईल असे मी समजते – एक म्हणजे गुरूने जे कार्य अंगी घेतले, त्या कार्यामधे तन-मन-धन लावून सहभागी होणे व अलीकडेच एका प्रवचनात महाराजांनी आणखी एक व्याख्या सांगितली, ती म्हणजे गुरुवचनाप्रमाणे, गुरु आज्ञेप्रमाणे, गुरूच्या अपेक्षेप्रमाणे आचरण करणे.
अशा प्रकारची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गुरुसेवा मज अल्पशक्ति-अल्पमती कडून श्री प्रभु निरंतर करवून घेवो व त्या योगेच चारही मुक्तिंची अनुभूति होवो हीच आजच्या परम पावन प्रसंगी प्रभुचरणी प्रार्थना 🙏🏻

श्री सद्गृरु मार्तंड प्रभुंच्या शब्दात सांगायचे तर
“सेवक हा तुमचा हो प्रिय
बोला मुखे अमुचा हो प्रिय
ज्ञानरूप मार्तांड स्वरूपी
अभेद मती जडू द्या।
सेवा ही घडू द्या।।”

ह्याच आशयाचे हे छोटेसे काव्य श्रीजींच्या सुमंगल चरणी सादर सप्रेम समर्पित

घडो निरंतर श्री गुरु सेवा।
इतुके मजसी देई देवा।।

ज्या ठायी मम वसे सद्गुरु
वारी पावो तेथ निरंतरु
लाभो “सालोक्याचा” ठेवा
इतुके मजसि देई देवा।
घडो निरंतर श्री गुरु सेवा।।

स्थान मिळावे सद्गुरु चरणी
तन-मन-धन पडो गुरु सत्करणी
“सामीप्याचा” ऱ्हास न व्हावा
इतुके मजसि देई देवा।
घडो निरंतर श्री गुरु सेवा।।

सद्गुरु वचनी अविचल श्रद्धा
अभ्यासे ढळो षड-वैरी बाधा
शीघ्रच मग “सारूप्य” पावावा
इतुके मजसि देई देवा।
घडो निरंतर श्री गुरु सेवा।।

सद्गुरु मज माय बाप भ्राता
सद्गुरु दाता सद्गुरु त्राता
द्वैत परी हा, तो ही निरसावा
“सायुज्याचा” योग घडावा
इतुके मजसि देई देवा।
घडो निरंतर श्री गुरु सेवा।।

हेचि अमुचे माहेर माहेर

 

हेचि अमुचे आहे माहेर माहेर
श्रीप्रभुचे धाम हे श्रीमाणिकनगर।। धृ।।

ज्ञानराज प्रभु माय माऊली माऊली
विसावतो त्यां प्रेमळ कृपेच्या साऊली।। 1।।

ज्ञानराज प्रभु आम्हांसि तात तात
साम-दामाने करती सहजी निभ्रांत।। 2।।

ज्ञानराज प्रभु वडिल बंधु बंधु
रक्षिती तरताना हा भवजलसिंधु।। 3।।

ज्ञानराज प्रभु सद्भाग्ये सद्गुरु सद्गुरु
तेची लोपवितील अज्ञान अंधारु।। 4।।

ज्ञानराज प्रभु-वचनाची गोडी गोडी
लावी मानसी प्रभुनगरीची बहू ओढी।। 5।।

ज्ञानराज प्रभुसी करिता नमन नमन
क्षणभर मर्कट मन होतसे “न मन”।। 6।।

ज्ञानराज प्रभु ठेवा शिरी हस्त हस्त
द्वैतासि करुनी टाका आता प्रभु नास्त।। 7।।

ज्ञानराज प्रभु ही एक विनती विनती
जन्म-मरणाची चुकवा अमुची फिरती।। 8।।

उठी उठी प्रभुराय

प्रातःकाली भरूनी ओंजळी भक्ति सुमनांजली
आले मानसपूजा कराया, उठी उठी प्रभुराया

मोहनिद्रेच्या मोहा त्यागुनी जागविली चेतना
षड्वैरी-मल धुतला, करूनि शुचिर्भूत स्नाना
शांत, सुनिर्मल, मंगल स्थाना, घालुनी सुख-आसना
आले मानसपूजा कराया, उठी उठी प्रभुराया

सत्वगुणांचे शुद्धोदकस्नान, भाव मृदुल दुकूला
मनन-जलासह जडमती रगडूनि चंदन तव भाला
त्यावरी तम-रज अबीर हरिद्रा कुंकुम आणि गुलाला
आले मानसपूजा कराया, उठी उठी प्रभुराया

अंतर्मन वाटिका, वेचले पुष्प परम-प्रीति
वाहीन तुजवरी कर्मरूपातील पत्रांच्या संगती
लावीन धूप अहंकाराचा, पंचप्राण आरती
ह्या उपचारे निर्गुण प्रभु तू होसि सगुण साजिरा
आले मानसपूजा कराया, उठी उठी प्रभुराया

पंचभुतात्मक पात्र स्थूलाचे, सूक्ष्म अन्नमय त्याते
आम्ल, तिख्त, मधुरम निजभाव अर्पिन नैवेद्याते
ध्यानाग्निने तपवूनि वृत्ति उष्मोदक तुजला ते
मुखशुद्धिस्तव भाव विशुद्ध अखेर अद्वैताचा
आले मानसपूजा कराया, उठी उठी प्रभुराया

संथ हृदयीच्या तालावरती ओंकाराचे गायन
नासती विक्षेपादि, करिता ज्ञान-चामरे सेवन
उन्मनीत मग विलीन व्हावे तिन्ही अवस्था नर्तन
भक्तिरसाने ओथंबुनिया, घालीन साष्टांग नमना
आले मानसपूजा कराया, उठी उठी प्रभुराया

योगक्षेमं वहाम्यहम्

ही गोष्ट आहे हरवलेल्या एका झांजेची… माणिकनगर ते नांदेड आणि पुन्हा माणिकनगर असा प्रवास करुन शेवटी माणिकनगर मध्येच सापडलेल्या एका झांजेची…

तर झाले असे की 2021 सालच्या दत्तजयंती उत्सवात प्रभु कृपेने आम्हा ठाणेकर भक्तांना एका नृत्यनाटिकेद्वारे प्रभुंची नाट्य सेवा करण्याचे सौभाग्य लाभले. नाटिकेकरिता इतर वाद्यांसोबत एक पखवाज आम्हास हवे होते. नांदेडचे काही प्रभु भक्त आले होते, त्यांच्या जवळ पखवाज होते, आणि त्यांनी आनंदाने आम्हास पखवाज दिले. स्टेज वर आमचे पखवाज वादक आणि झांज वादक बाजुबाजुला बसले होते. नाटिका झाल्यावर सर्व कलाकारांना आशीर्वाद घेण्यास महाराजांच्या निवास स्थानी बोलविण्यात आले. त्या लगबगीत सर्व वाद्ये स्टेज वर तशीच ठेवून आम्ही तेथून निघालो. आमच्या मागे इतर ठाणेकर प्रभु भक्तांनी स्टेज वरील सामानांची आवराआवर केली. श्री विजय कुलकर्णी ह्यांनी पखवाज नांदेडकरांनी दिलेल्या पिशवीत भरले. झांज कोणाची ते ठाऊक नसल्यामुळे, आणि ती पखवाजा बाजुलाच असल्यामुळे त्यांनी त्याच पिशवीत झांज सुद्धा भरली. नांदेडकर भक्त आपली पिशवी घेऊन गेले. खूप वेळा नंतर सामान गोळा करताना आमच्या लक्षात आले की झांज सापडत नाही आहे! झांज नांडेडकरांच्या पिशवीत आहे, हे कळल्यावर त्यांच्या कडे चौकशी केली, मात्र त्यांना पखवाजाच्या पिशवीत झांज काही सापडेना!! ती झांज होती ठाणेकर प्रभुभक्त श्री सुभाष चित्रे (माझे वडिल) ह्यांची. झांज हरवली हे ऐकून बाबा अगदीच हताश झाले!!

एक छोटीशी झांजच ती! तिचे एवढे काय कौतुक??कौतुक एवढ्यासाठी की शंभर वर्षाहून अधिक काळ ही झांज आमच्या कुटुंबात असावी. कारण ही झांज आमच्या पणजोबांच्या बालपणापासून तरी नक्कीच आमच्याकडे आहे असे माझे आजोबा सांगायचे आणि पणजोबांचा जन्म १९०० सालचा होता. दुसरे असे की असा नाद व आवाजाचा गोडवा असलेली झांज आजपर्यंत शोधुनही कुठे मिळाली नाही. गणेशोत्सवात व नवरात्रोत्सवात बऱ्याच ठिकाणी आम्ही ही उपयोगात आणतो. ज्या आप्तांकडे आरती अथवा भजनाला आम्ही जातो त्यांचा आग्रहच असतो की येताना ही झांज आठवणीने घेऊन यावी.

तर अशी ही चित्रे कुटुंबाची ठेवणीतील झांज माणिकनगर मध्ये हरवली! माझे बाबा, माझे काका – ह्यांना तर अनेक दिवस स्वस्थ झोप लागेना. जवळचे आप्त, मित्र ही हळहळले!

पुढे वेदांत सप्ताहासाठी आम्ही पुन्हा माणिकनगरला आलो. एके दिवशी एक सद्गृहस्थ माझ्या पाशी आले व जयंती उत्सवात नृत्यनाटिका आम्हीच केली होती का म्हणून चौकशी केली. मी हो म्हटल्यावर ते म्हणाले “तुमची एक झांज हरवली होती ना त्या वेळी? ती आमच्या पाशी आहे”. ” काय? आपल्या कडे? कसे काय? आपण कोण? कुठून आलात?” – मी विचारले. ते म्हणाले – “माझे नाव उत्तरवार. मी नांदेडहून आलोय. नांदेडला परतल्यावर ती झांज आमच्या एका पिशवीत सापडली. पखवाजाच्या पिशवीत नाही, दुसऱ्याच एका पिशवीत”.

आम्हाला कोण आनंद झाला!!! प्रभु कृपेनेच झांज मिळाली असे उद्गार सर्वांनी काढले. माझे वडिलच नाही, तर तेव्हा हळहळलेल्या सर्वांच्या डोळ्यात आता आनंदाश्रु आले! माझ्या आईला ही गोष्ट समजली, तेव्हा ती हसली, म्हणाली “मला आनंद तर झाला आहे, पण आश्चर्य नाही वाटत, कारण मला खात्री होती की वेदांत सप्ताहात आपल्याला झांज सापडणार!!” खात्री होती?? कशी काय? तर म्हणाली “मी प्रभुंकडे नवस बोलले होते, सप्ताहात झांज परत मिळावी म्हणून, आणि मला 100 टक्के खात्री होती की तसेच होणार”!! नंतर माझ्या काकांकडून कळले, की ते सुद्धा नवस बोलले होते!

श्री प्रभु!! त्यांच्या नावातच प्रभुत्व!! पण भक्तांच्या छोट्या छोट्या मनोकामना पूर्ण करण्यास सदैव तत्पर असतात आपले प्रभु! आणि अपेक्षा कसली, तर फक्त भाबड्या भक्तिची आणि अढळ श्रद्धेची!!

नवस तरी वेगळा काय असतो? हो, काही लोक म्हणतात की नवस म्हणजे देवाबरोबर केलेला सौदा आहे. खरे आहे काही अंशी – सौदाच की तो.. पण कसला? तर आपल्या भावना आणि त्याची कृपा ह्यांचा!! वस्तु तर निमित्तमात्र आहेत, एक माध्यम आहेत – आपल्या भावना आणि त्याची कृपा एकमेकांना व्यक्त करून दाखविण्याकरिता.

अशा छोट्या-छोट्या अनुभवांतून हे सतत जाणवत रहाते की भगवद्गीतेत भगवंतांनी दिलेले ‘योगक्षेमं वहाम्यहम’ हे वचन आपले प्रभु आज ही पूर्ण करीत आहेत, आणि म्हणुनच एका प्रसिद्ध गाण्याचा आधार घेत असे म्हणावेसे वाटते –

लाभले आम्हास भाग्य भजतो प्रभु माणिकेश

लाभले आम्हास भाग्य भजतो प्रभु माणिकेश
जाहलो खरेच धन्य पुजतो प्रभु माणिकेश

कृष्ण, विष्णू, जगदंब, सांब, राम – माणिकेश
काशी, पुरी, गिरीनार, चारधाम – माणिकेश

नित्य आमुचे प्रात:स्मरण – प्रभु माणिकेश
जप, तप, ध्यान आणि धारण – प्रभु माणिकेश

बेसुरेसे सूर अमुचे भजन करत – माणिकेश
वाणी आणि लेखणी करी स्तवन सतत – माणिकेश

परिक्षे, प्रवासा आधी स्मरतो प्रभु माणिकेश
असो काहीही प्रसंग प्रार्थितो प्रभु माणिकेश

वारसा पुढील पिढीस – भक्तिभाव माणिकेश
स्थान श्रद्धेचे अमुचे, एक ठाव – माणिकेश