प. पू. श्री ज्ञानराज माणिक प्रभू महाराजांच्या चरणी साष्टांग नमस्कार

संपूर्ण अधिक महिनाभर (पुरुषोत्तम मास) आपल्या मुखातून बाहेर पडणारी अमृतवाणी म्हणजे जसे काही दुग्धपान आम्ही प्राशन करीत होतो. आपल्यामुळे आम्हाला भरभरून गीता ज्ञान प्राप्त करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. या गीता ज्ञान यज्ञात भाग घेण्याचे भाग्य आम्हा सर्वांना लाभले.

नारद भक्ति सूत्रात नारद मुनींनी म्हटले आहे की परमेश्वराच्या कृपेशिवाय महापुरुषांचा संग प्राप्त होत नाही. नक्कीच श्री माणिक प्रभूं ची आम्हा सर्वांवर कृपा आहे म्हणूनच आम्ही या गीता ज्ञान यज्ञात सहभागी होऊ शकलो.

आपण महिनाभर अतिशय मेहनत घेऊन १३,१४व१५ या भगवद्गीतेतील ३ अध्यायातील अनेक वचने आम्हाला समजतील अशा तऱ्हेने अनेक कथा सांगून सोप्या रीतीने वर्णन करून सांगितलेत.

आपली अनेक प्रवचने आम्हाला या भवसागरातून पार व्हायला मदतच करीत असतात. परंतु ह्या अधिक महिन्याची गोष्ट आणखीनच प्रेरणादायी होती.६ कधी वाजतात याची आम्ही वाट बघत असू. आपण आमच्यापासून दूर आहात असे कधी जाणवलेच नाही.

आम्ही आपल्या समोर बसून ज्ञान रसाचे दुग्धपान करीत आहोत असेच वाटत असे.मनात अनेक प्रश्न निर्माण होत असत परंतु आपल्या दुसऱ्या दिवसाच्या प्रवचनात त्याची उत्तरे मिळत असत.

जो आपला उद्देश होता आणि ज्यासाठी आपण एवढी मेहनत घेतली तो आम्ही वाया नाही जाऊ देणार. आम्ही यापुढेही श्रवण, मनन, निदिध्यासन चालूच ठेवू आपला आशीर्वाद मात्र आम्हावर कायम असावा हीच प्रभु चरणी प्रार्थना.

अशाच अनेक प्रसंगांनी आपल्या कडून मिळणारे हे ज्ञानाचे स्त्रोत अखंड चालू राहो हीच प्रार्थना.

[social_warfare]